शिवज्योतींच्या आगमनाने तळेगाव दाभाडे होणार शिवमय शिवपाईकांच्या सन्मानासाठी ऐतिहासिक सोहळा सज्ज
तळेगाव दाभाडे: येत्या श्री शिवजयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरीत शिवतेजाचा महासंगम साकार होणार असून विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांवरून प्रज्वलित करून आणण्यात येणाऱ्या श्री शिवज्योती आणि शिवपाईकांच्या स्वागत, सत्कार व अभिवादनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फाल्गुन कृष्ण तृतीया, शुक्रवार दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी हा सोहळा उत्साहात आणि शिवमय वातावरणात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
अखिल श्री शिवजयंती उत्सव तळेगाव दाभाडे, छत्रपती श्री शिवशंभू स्मारक कार्यकारी समिती तसेच ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांसाठी हा सोहळा अभिमान, प्रेरणा आणि ऐतिहासिक स्मरणाचा साक्षीदार ठरणार असून संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात येणार आहे.
शिवजयंतीच्या मंगलप्रभातीत सर्व श्री शिवज्योत मंडळांनी आपल्या शिवपाईकांसह श्री शिवशंभूतीर्थ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गड-किल्ल्यांच्या पवित्र मातीतून चेतवून आणलेल्या शिवज्योतींचे विधिवत पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिवपाईकांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या समर्पणाचा गौरव केला जाणार आहे. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असल्याचे चित्र आहे.
शिवज्योत ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेचे प्रतीक मानली जाते. या पवित्र ज्योतींचा सन्मान म्हणजे स्वराज्याच्या विचारांचा गौरव, अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या स्वागत सोहळ्याला विशेष ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमस्थळी सर्व शिवज्योत मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली असून शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवजयंतीचा हा प्रेरणोत्सव ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करून देत भावी पिढ्यांमध्ये स्वाभिमानाची ज्योत चेतवणारा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















