औंढे येथे दुर्गामाता दौड व सांस्कृतिक उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोनावळा : नवरात्री उत्सवानिमित्त औंढे गावात गेली दोन वर्षे सुरू असलेली प्रभातफेरी व दुर्गामाता दौड यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. नारीशक्ती व गावातील युवा पिढी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात असून यातून लहान मुलांमध्ये हिंदू संस्कृतीचे जतन व हिंदू सणांविषयी जागृती घडवण्याचे कार्य केले जात आहे.
या संदर्भात माहिती देताना मुकुंद घनवट म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून गावकरी रोज मोठ्या संख्येने प्रभातफेरी व दुर्गामाता दौडीत सहभागी होत आहेत. नवरात्रीचे नऊ दिवस विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नव्या पिढीमध्ये धार्मिक व सांस्कृतिक मूल्ये रुजवली जात आहेत.”
कार्यक्रमांची रूपरेषा सांगताना त्यांनी पुढे माहिती दिली की, रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी वकृत्व स्पर्धा होणार असून यात विद्यार्थी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. हिंदू राष्ट्र सेना जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिगंबर पडवळ यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.
गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून व विविध समित्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: तरुणाईचा यात मोठा सहभाग असून महिला वर्गही सक्रीयपणे पुढे येत आहे.
औंढे ग्रामस्थांनी सुरू केलेली दुर्गामाता दौड व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा आज संपूर्ण परिसरासाठी आदर्शवत ठरत असून हिंदू सणांची खरी भावना नव्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम या गावाने करून दाखवले आहे. त्यामुळे औंढे गाव नवरात्री उत्सवातील धार्मिकता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र बनले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो. ९९२१८०७०११



















