
कामशेतमध्ये वाहतूक कोंडीला ब्रेक! १ जानेवारीपासून नवे वाहतूक नियोजन लागू
कामशेत : कामशेत शहर व परिसरात सातत्याने वाढत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ जानेवारीपासून कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवे वाहतूक नियोजन राबविण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


नव्या नियोजनानुसार पवना चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग शहरात प्रवेशासाठी एकेरी राहणार आहे. शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक – कामशेत पोलिस स्टेशन – पाठीमागील रस्ता – पवना चौक हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
तसेच, सकाळी ८ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८.३० या गर्दीच्या वेळेत कामशेत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शालेय वेळा व कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


वाहतुकीचे नियमन प्रभावीपणे राबविण्यासाठी पवना चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन्ही मार्ग, पवना चौक ते मुंबई–पुणे महामार्गाकडील दोन्ही बाजू, तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कामशेत पोलिस स्टेशन या मार्गावर पार्किंगला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पवना चौक व शिवाजी महाराज चौक येथे कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करता येणार नाही.
दरम्यान, मुंबई–पुणे महामार्गावरून पवना चौकात अवजड वाहनांना यू-टर्न घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक नियोजनाचा सविस्तर आराखडा उपलब्ध असून सर्व वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकरराव पाटील यांनी केले आहे.


नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे कामशेत शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नव्या वाहतूक नियोजनाबाबत कामशेत शहरातील नागरिक, व्यापारी व वाहनचालकांकडून संमिश्र पण सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक दिवसांपासून शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची गर्दी व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
कामशेत चे रहिवासी कमरूद्दीन शेख म्हणाले, सकाळी व सायंकाळी चौकात अक्षरशः वाहनांचा महासागर असतो. एकेरी मार्ग व अवजड वाहनांवरील निर्बंधामुळे आता तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
व्यापारी वर्गानेही या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी सांगितले, “सुरुवातीला थोडा त्रास होईल; मात्र वाहतूक सुरळीत झाल्यास ग्राहकांनाही ये-जा करणे सोपे होईल. प्रशासनाने पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था केल्यास अधिक सोयीचे ठरेल.

दरम्यान, काही वाहनचालकांनी नवीन मार्गांबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे. दुचाकी चालक पूजा कदम म्हणाल्या, “नवे नियम चांगले आहेत; पण सुरुवातीच्या काळात मार्गदर्शनासाठी पोलिस व सूचनाफलक आवश्यक आहेत.
एकूणच, वाहतूक कोंडी कमी होऊन शहरात शिस्तबद्ध वाहतूक निर्माण व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा असून, नवे वाहतूक नियोजन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























