
जांभवडे गावातील रस्त्याची दुरवस्था — नागरिक त्रस्त, अवजड वाहनांच्या वाहतुकीने समस्या गंभीर
जांभवडे (ता. मावळ) : जांभवडे गावातील मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. या रस्त्यावरून रोज हजारो नागरिकांची ये-जा होत असली, तरी रस्त्याची अवस्था पाहता प्रवास हा धोक्याचा खेळ ठरत आहे. विशेषतः ट्रक, डंपर आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरील डांबर उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण आणि अपघातांच्या घटना वाढू लागल्या आहेत.


पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते लहान तळ्यांचे रूप धारण करतात. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. तर उन्हाळ्यात या खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीचा त्रास विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना सहन करावा लागतो.
“दररोज शाळेला ये-जा करताना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटते. रस्त्यावरून चालतानाच धूळ डोळ्यांत जाते, श्वास घेणंही कठीण होतं,” असे स्थानिक रहिवासानी सांगितले. अनेक दुचाकीस्वारांनी किरकोळ अपघातांचा अनुभव सांगितला आहे. गावात वाहन बिघडल्याने किंवा चिखलात अडकल्याने वाहतूक तासन्तास ठप्प होते, अशी परिस्थिती वारंवार उद्भवते.


ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार ग्रामपंचायत, तसेच स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तथापि, तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसांतच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब होतो, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. “फक्त वरवरचा उपाय नको, कायमस्वरूपी दुरुस्ती झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिक करत आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी वर्ग आणि शेतकरीदेखील अडचणीत आले आहेत. मालवाहतूक करताना वाहनांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची तक्रार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.


ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “दरवर्षी निवडणुकांच्या वेळी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले जाते; पण कामे केवळ कागदावरच होतात.” त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.
गावातील सर्वसामान्यांची आता एकच अपेक्षा — प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















