
मावळात रब्बी हंगामाची दमदार सुरुवात: मुबलक ओलाव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट
कामशेत: मावळ तालुक्यात यंदाच्या नियमित आणि समाधानकारक पावसामुळे जमिनीत ओलावा मुबलक प्रमाणात टिकून आहे. खरीप हंगामाची भात कापणी जवळजवळ पूर्णत्वास जात असतानाच रब्बी हंगामासाठी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील नाणे मावळ, पवन मावळ, अंदर मावळ तसेच इतर ग्रामीण भागांतील शेतकरी मोठ्या उत्साहाने रब्बी पिकांच्या पेरणीकडे वळू लागले आहेत.


तालुक्यात मध्यम काळ्या तसेच डोंगराळ जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या जमिनीत हरभरा, वाटाणा आणि तूर यांसारख्या पिकांना उत्तम उत्पादन मिळते. गेल्या काही वर्षांत या पिकांना बाजारात वाढती मागणी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांकडे अधिक वाढला आहे. यंदाही या पिकांना चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी अधिक उत्साहात आहेत.
खरीप हंगामातील भातपिकाचे काढणीकार्य संपताच शेतकरी उपलब्ध ओलावा आणि जमिनीच्या स्थितीचा विचार करून तातडीने रब्बी पेरणीस सुरुवात करतात. यंदा वेळेवर पावसाचे आगमन, नियमित पाऊस आणि त्यासोबतच काही भागांत मिळालेला हलका धूर पाऊस यामुळे जमिनीचा पोत सुधारला असून पेरणीयोग्य आद्रता दीर्घकाळ टिकून आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी हे वर्ष अनुकूल ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.


शेतकरी सांगतात की, हरभरा आणि वाटाण्याचे उत्पादन खर्च तुलनेने कमी येत असल्याने आणि बाजारात विक्रीदर समाधानकारक मिळत असल्याने हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. रासायनिक खतांचा मर्यादित वापर आणि पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च आणखी घटतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या पिकांचे उत्पन्न आणि नफा दोन्ही वाढल्याचे चित्र दिसते.


यंदा तालुक्यात विविध प्रकारच्या रब्बी पिकांची पेरणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसत आहे. काही गावांमध्ये तर पेरणीचे काम जवळजवळ पूर्णत्वास गेले आहे. सतत वाढणारी बाजारातील मागणी, हवामानाची अनुकूलता आणि उपलब्ध पाण्याचा योग्य उपयोग हा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक घटक ठरत आहे.

रब्बी हंगामाची ही चांगली सुरुवात होऊन येत्या दिवसांत पिकांची वाढ आणि बाजारभाव स्थिर राहिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















