
आदेशांना हरताळ! सावळा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर कारवाई न झाल्यास १८ डिसेंबरला पंचायत समितीत ‘गाढव आंदोलन
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सावळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही तब्बल आठ महिने उलटून गेले तरी गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात पंचायत समिती वडगाव मावळ येथे थेट आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या १८ डिसेंबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी कार्यालयात गाढव आणून आंदोलन करण्यात येणार असून, दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर यांनी दिला आहे.


मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिनांक १५ जून २०२५ रोजी पंचायत समिती वडगाव मावळ येथे शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत मावळ तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेताना सावळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यानंतर आमदारांनीही अनेक वेळा गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. मात्र, खासदार व आमदारांचे आदेश असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे.


या प्रकरणात तीन वेळा चौकशी समित्या नेमण्यात आल्या असून, तिन्ही वेळा भ्रष्टाचार झाल्याचे अहवाल सादर झाले आहेत. नियमानुसार अशा अहवालानंतर ३० दिवसांच्या आत दोषींवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनीही चार वेळा कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही गटविकास अधिकारी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शोभिनाथ भोईर यांनी केला आहे आहे.


पुरावे, अहवाल आणि वरिष्ठांचे स्पष्ट आदेश असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींचे आदेशही पाळत नसतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, “आता तरी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा १८ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती वडगाव मावळ येथील गटविकास अधिकारी कार्यालयात थेट गाढव आंदोलन केले जाईल. गुन्हा दाखल होईपर्यंत गाढव पंचायत समितीतून बाहेर नेले जाणार नाही,” असा ठाम इशारा भोईर यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















