कामशेत ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून ग्रामसभेत नागरिकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
कामशेत : ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही समस्या न सुटल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८ सप्टेंबर २०२५) खडकाळे येथे घडली.
रामचंद्र धावडे असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
नेमके प्रकरण काय?
रामचंद्र धावडे हे शेतकरी आपल्या शेतात बांधलेल्या घरात मागील सहा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र गेली चार वर्षे त्यांच्या घरात गावातील सांडपाणी शिरत आहे. पावसाळ्यात तर या सांडपाण्याचा त्रास अधिक वाढतो. या पाण्यासोबत साप, विंचू, बेडूक यांसारखे प्राणी घरात घुसतात, त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.
ग्रामपंचायतीकडे तक्रारींचा पाढा
धावडे यांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे लेखी व तोंडी तक्रारी करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यांना केवळ “निधी नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. यामुळे ते हताश झाले होते.
ग्रामसभेत संतापाचा उद्रेक
सोमवारी खडकाळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आयोजित ग्रामसभेत धावडे यांनी पुन्हा एकदा आपली समस्या मांडली. ग्रामसेवक धनंजय देशमुख यांनी यावेळी देखील “निधी नाही” असे सांगत प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. या वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या धावडे यांनी ग्रामसभेतच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांनी वाचवले प्राण
ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ हस्तक्षेप करून धावडे यांच्या हातातील रॉकेलची बाटली व माचिस हिसकावून घेतली. यानंतर कामशेत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर तात्काळ कारवाई
धावडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर सरपंच रुपेश गायकवाड व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या जागेवर तातडीने पाहणी केली. यानंतर आश्चर्यकारकरित्या, जेसीबीच्या साहाय्याने त्वरित काम सुरू करण्यात आले. धावडे यांच्या शेतात शिरणाऱ्या सांडपाण्याच्या लाईन बुजविण्यात आल्या. आजवर निधी नसल्याचे सांगणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेनंतर अवघ्या काही तासांत काम पूर्ण केले.
नागरिकांचा सवाल
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. “जर निधी नव्हता तर घटना घडल्यानंतर अचानक काम कसे सुरू झाले?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका शेतकऱ्याला आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला, हे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर बोट ठेवणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
(प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११



















