तळेगावात धर्मविर बलिदान मास श्रद्धा संयमाने सुरू
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील युवकांनी पुन्हा एकदा इतिहासाच्या जाज्वल्य पानांना उजाळा देत छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ ‘धर्मवीर बलिदान मास’ पाळण्याचा निर्धार केला आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही १८ फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत श्रद्धाभावाने साजरी होत आहे. हा संपूर्ण कालखंड सुतकाचा, म्हणजेच दुःखवट्याचा महिना म्हणून अत्यंत संयमाने आणि निष्ठेने पाळला जात आहे.
या बलिदान मासादरम्यान दररोज शहरातील शिवशंभू तिर्थ येथे एकत्र येऊन युवकांकडून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र आणि निवडक श्लोकांचे सामूहिक वाचन केले जाते. मंत्रोच्चारांच्या निनादात इतिहासाची स्मृती जागी ठेवण्याचा आणि धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या धर्मवीरांना अभिवादन करण्याचा संकल्प करण्यात येतो. या उपक्रमातून केवळ स्मरण नव्हे, तर विचारांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न असल्याची भावना सहभागी युवकांनी व्यक्त केली.
संभाजी महाराजांनी अमानुष छळ सहन करतानाही धर्म आणि स्वराज्याशी तडजोड केली नाही. त्यांच्या अद्वितीय त्यागामुळेच हिंदवी स्वराज्याची ज्योत अखंड प्रज्वलित राहिली, असा ठाम विश्वास युवकांमध्ये दिसून येतो. धर्मासाठी मृत्यू पत्करला, पण अधर्माशी हातमिळवणी केली नाही, हीच त्यांची खरी ओळख असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
बलिदान मासाच्या काळात युवक अत्यंत साधेपणाने जीवन जगण्याचा संकल्प करीत आहेत. गोड पदार्थांचा त्याग, पादत्राणे न घालणे, जमिनीवर झोपणे अशा कठोर आचारांचे पालन केले जात आहे. काही युवकांनी मुंडन करून आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली आहे. या प्रतीकात्मक कृतींतून महाराजांच्या वेदनांची जाणीव मनात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. हा केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धीचा आणि इतिहासाशी नाळ जोडण्याचा उपक्रम असल्याचे चित्र आहे.
तळेगावातील युवक शौर्य गणेश भेगडे यांनी सांगितले, बलिदान मास ही केवळ परंपरा नाही, तर त्याग, सहनशीलता आणि धर्मनिष्ठा यांचे स्मरण करून देणारा प्रेरणाकाल आहे. या माध्यमातून नव्या पिढीला संभाजी महाराजांच्या बलिदानाचा खरा इतिहास समजतो. राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होते.
शहरातील विविध भागांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून युवकांमध्ये इतिहासाविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे. धर्मवीरांच्या स्मृतींना अभिवादन करत तळेगाव दाभाडेकर युवकांनी इतिहासाचे हे तेजस्वी पान नव्या पिढीसमोर जिवंत ठेवण्याचा संकल्प दृढ केला आहे. श्रद्धा, संयम आणि राष्ट्राभिमान यांचा संगम असलेला हा धर्मवीर बलिदान मास’ तळेगावच्या सांस्कृतिक चेतनेला नवसंजीवनी देत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११























