माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांची मावळच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक संपन्न
तळेगाव दाभाडे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या ६५ मीटर रिंग रोड व बाह्यवळण मार्ग (टीपी स्कीम) याविरोधात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होत आहे. या प्रकल्पामुळे बागायती शेतीचा मोठा बळी जाणार असल्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, परदवडी, धामणे व नेरे या गावातील शेतकऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे प्रमुख उपस्थित होते. बैठकीला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर राहिले होते.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी एकमुखाने रिंग रोड व टीपी स्कीमचा ठाम विरोध नोंदवला. या प्रकल्पाचा परिसर ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर बागायती जमीन आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न हा थेट अन्याय असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
माजी राज्यमंत्री भेगडे म्हणाले की, “या स्कीममुळे स्थानिक शेतकऱ्यांवर गंभीर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प कधीही राबविला जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.”
शेतकऱ्यांनी बैठकीत इशारा दिला की, “हा रिंग रोड प्रकल्प त्वरित रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
यावेळी अनेक शेतकरी नेत्यांनीही शासनाच्या आडमुठ्या धोरणावर टीका केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र राहून लढा देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे मो. ९९२१८०७०११



















