मावळ तालुक्यातील उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी, नमो उद्यान योजनेतून तळेगाव, लोणावळा, वडगाव व देहू नगरपंचायतींना लाभ
मावळ, दि. १२ सप्टेंबर : मावळ तालुक्यातील नागरी भागातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यातील चार प्रमुख नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील उद्यानांच्या विकासासाठी ‘नमो उद्यान’ योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. या कामांना प्रशासनाकडून अधिकृत मान्यताही मिळालेली असून, लवकरच उद्यान विकासाची प्रत्यक्ष कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंजूर निधीचे वाटप
तळेगाव दाभाडे नगरपरिषद – रु. १ कोटी
लोणावळा नगरपरिषद – रु. १ कोटी
वडगाव नगरपंचायत – रु. १ कोटी
श्री क्षेत्र देहू नगरपंचायत – रु. १ कोटी
यामुळे तळेगाव, लोणावळा, वडगाव आणि देहू या चारही शहरांमध्ये नागरिकांना आधुनिक व आकर्षक सुविधा असलेली उद्याने उपलब्ध होणार आहेत.
नागरिकांची जुनी मागणी पूर्ण
गेल्या अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील नागरी भागांमध्ये उद्यान विकासाची मागणी होत होती. अपुरी साधने, दुरवस्थेत गेलेली उद्याने आणि झपाट्याने वाढणारे शहरीकरण यामुळे नागरिकांना विश्रांतीसाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. नमो उद्यान योजनेतून आलेल्या या निधीमुळे उद्यानांना आधुनिक रूप मिळणार असून, नागरिकांना आरोग्यदायी व आनंदी वातावरणाचा लाभ होईल.
आमदार सुनील शेळके म्हणाले,
“महायुती सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील नागरी भागांना उद्यान विकासासाठी ४ कोटींचा निधी मिळवून दिल्याचा मला आनंद आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दर्जेदार सुविधा असलेली उद्याने उपलब्ध होतील. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.” शेळके यांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच नगरविकास विभागाचे विशेष आभार मानले.
सामाजिक व आरोग्यदायी केंद्र म्हणून उद्याने
उद्याने ही केवळ विरंगुळ्याची साधने नसून, सामाजिक संवादाचे व आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत. सकाळच्या व संध्याकाळच्या व्यायामासाठी, योगाभ्यासासाठी, मुलांच्या खेळांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या संवादासाठी उद्याने महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या निधीमुळे मावळ तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षांची पूर्तता होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



















