मावळ तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
मावळ तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली असून तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, लोणावळा, देहूरोड, पवनानगर आदी भागात जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. लोणावळा शहरात २४ तासात तब्बल २२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जुना पुणे मुंबई महामार्गावर घोरावाडी डोंगर पायथा येथे तसेच साते ब्राह्मण वाडी गावाजवळ पावसाचे पाणी महामार्गावर आले असून वाहतूक संथ गतीने चालू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज आहे.
जोरदार पावसाने मावळ तालुक्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मावळ मधील ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस पडत आहे. पवना धरणात ३५.६३ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती पवना धरण शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे. पवन मावळ, अंदर मावळ, नाणे मावळ या ठिकाणी सर्वत्र डोंगरदऱ्यामध्ये धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे.
या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमू लागली असून नागरिकांनी व पर्यटकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले असून. धोकादायक ठिकाणी पर्यटक व नागरिकांनी जाऊ नये. जोरदार पावसाने मावळ तालुक्यातील भात खाचरे पूर्णपणे भरून गेली आहे. तालुक्यातील सर्व डोंगर या पावसाने हिरवेगार झालेले पाहायला मिळत आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















