
लोहगड किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनपेक्षित भेट; ग्रामस्थांत आनंदाचा उत्साह
पवनानगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खाजगी दौऱ्यातील काही क्षण काढत ऐतिहासिक लोहगड किल्ल्याला भेट दिली. या अनपेक्षित भेटीने लोहगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


या प्रसंगी लोहगड-विसापूर विकास मंच तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक स्वागत केले. मंचाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना संस्थेच्या उपक्रमांची, स्थानिक विकासाच्या प्रयत्नांची आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली.


१२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या अचानक भेटीमुळे लोहगड परिसरातील विकासाच्या नव्या शक्यता खुल्या होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या भेटीला माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, लोहगड-विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मृणाल गुलाबराव म्हाळसकर तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भेट त्यांच्या दृष्टीने एक “सुवर्णक्षण” ठरली असून, आगामी काळात त्यांना पुन्हा वेळ मिळाल्यास लोहगड पायथ्याशी भव्य शिवसष्टी प्रकल्प उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















