
तळेगावच्या युवा लेखक ओंकार वर्तले यांच्या दोन पुस्तकांना शासनमान्यता
तळेगाव दाभाडे: गड, किल्ले आणि मंदिरांचा सखोल अभ्यास करून त्यावर माहितीपूर्ण लेखन करणारे तसेच दैनिक सकाळ मध्ये नियमितपणे वाचनीय भटकंती सदर लिहिणारे तळेगावचे युवा लेखक ओंकार महादेव वर्तले यांच्या दोन पुस्तकांना नुकतीच महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. साहित्य क्षेत्रात सातत्याने नवे प्रयोग करत असलेल्या वर्तले यांच्या ‘हिमाचल : स्पिती. पिन. सांगला’ आणि ‘नर्मदा उत्तर वाहिनी – माघ महिन्यातील परिक्रमा’ या दोन पुस्तकांना ही मान्यता मिळाल्याने मराठी भटकंती साहित्य विश्वात त्यांचे योगदान अधोरेखित झाले आहे.


‘हिमाचल : स्पिती. पिन. सांगला’ हे पुस्तक हिमालयातील अति दुर्गम आणि कमी परिचित अशा गार वाळवंट प्रदेशातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण आहे. हिमाचलमधील स्पिती, पिन आणि सांगला खोऱ्यातील निसर्ग, संस्कृती, स्थानिक जीवनशैली आणि धार्मिक परंपरांचा बारकाईने अभ्यास करून वर्तले यांनी हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. या भागावर मराठीत लिहिलेले हे पहिलेच पुस्तक मानले जात असून, पर्वतरांगांच्या सान्निध्यातील पर्यटन आणि साहसप्रेमींसाठी ते एक संदर्भग्रंथ ठरत आहे.
तर ‘नर्मदा उत्तर वाहिनी – माघ महिन्यातील परिक्रमा’ हे पुस्तक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. माघ महिन्यात पार पडणारी ही तीन ते चार दिवसांची परिक्रमा प्रामुख्याने गुजरात राज्यातून जाते आणि या मार्गावर अनेक जागृत देवस्थाने आहेत. या परिक्रमेतील अध्यात्मिक अनुभव, श्रद्धेचा आविष्कार आणि प्रवासातील सामाजिक रंग यांचे सुंदर वर्णन वर्तले यांनी केले आहे.


ही दोन्ही पुस्तके ‘नाविन्य प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशित केली आहेत. याआधी वर्तले यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशनही याच प्रकाशन संस्थेने केले असून, त्यांच्या लेखनातील विषयवैविध्य आणि प्रामाणिकपणा यामुळे वाचकवर्गात त्यांना विशेष प्रतिसाद मिळतो आहे.
आत्तापर्यंत ओंकार वर्तले यांनी एकूण १४ पुस्तके प्रकाशित केली असून, त्यापैकी सहा पुस्तकांना शासनमान्यता प्राप्त झाली आहे. त्यांच्या लिखाणाला केवळ प्रवासी आणि निसर्गप्रेमी वर्गाचाच नव्हे तर इतिहास आणि भूगोल अभ्यासकांचाही प्रतिसाद मिळत आहे.


वर्तले यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये म्हणजे स्थानिक इतिहास, लोककथा, देवस्थाने, निसर्ग आणि साहस यांचा संगम. ‘सह्याद्रीतील ऑफ बीट भटकंती’, ‘आडवाटेकरची भटकंती’, ‘सफर मावळची’, ‘मंदिरांच्या देशा’, ‘प्रेक्षणीय महाराष्ट्राची भटकंती’, ‘महाराष्ट्रातील प्राचीन लेणी’, ‘सफर निसर्गरम्य भोरची’, ‘लेह-लडाख’, ‘गोष्ट यशस्वी अभिमन्यूची’, ‘एक झुंज वाघाशी’ आणि ‘गडकिल्ले’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत.
‘दैनिक लोकमत (ठाणे)’, ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘दैनिक लोकसत्ता’ या वृत्तपत्रांमधूनही त्यांनी विविध विषयांवर प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या भटकंती सदरातून महाराष्ट्रातील गडकोट, लेणी आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याबाबत वाचकांमध्ये जाणीव निर्माण झाली आहे.
ओंकार वर्तले यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण लेखनाने मराठी प्रवासवर्णन आणि भटकंती साहित्यात नवी दिशा दिली आहे. शासनमान्यता मिळाल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान तर झाला आहेच, पण नव्या पिढीतील वाचकांना प्रेरणा देणारा एक उत्तम आदर्शही घालून दिला आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















