वडगाव नगरपंचायतच्या कृत्रिम विसर्जन तलावांचे नागरिकांकडून स्वागत
पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव (ता. मावळ, जि. पुणे) – स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत वडगाव नगरपंचायतने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची नवी पाऊलवाट दाखवली. मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे २८५० गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले. तसेच सुमारे २ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
कृत्रिम विसर्जन तलाव व मूर्तिदान केंद्र
नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी नगरपंचायतीने शहरात एकूण आठ ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलश उभारले होते. यात –
माळीनगर क्रिकेट ग्राउंड जवळ
विजयनगर पीडीसीसी बॅंक जवळ
केशवनगर पाण्याच्या टाकी जवळ
प्रभाग क्र. १६ पाणी टाकी लगत
विशाल लॉन्स मागे संभाजी नगर परिसर
वडगाव स्मशानभूमी मागे
पोटोबा मंदिर प्रांगण
टेल्को कॉलनी व मोरया कॉलनी परिसर
तसेच नगरपंचायत कार्यालयात विशेष मूर्तिदान केंद्र सुरू करण्यात आले होते.
पर्यावरण प्रेमींचा सहभाग
नगरपंचायतीच्या आवाहनानुसार जय मल्हार ग्रुप, तसेच स्वप्नील तांबे, कमलेश सोळंकी, नितीन कांबळे, किशोर कांबळे, नीलिमा पवार आदींनी स्वईच्छेने मूर्ती दान करत पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली.
निर्माल्य संकलनासाठी रथ व्यवस्था
शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे निर्माल्य दैनंदिन संकलित करण्यासाठी नगरपंचायतने विशेष निर्माल्य रथाची सोय केली होती. या रथाद्वारे संकलित निर्माल्य पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आले.
नागरिकांचा पर्यावरणपूरक उत्सव
यंदा बहुसंख्य नागरिकांनी घरोघरी मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पारंपरिक सजावट केली. विसर्जनावेळी सर्वांनी निर्माल्य कलशाचा वापर करून पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी योगदान दिले.
घोषवाक्यांनी दिला हरित संदेश
या अभियानात वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण अशा घोषवाक्यांद्वारे जनजागृती करण्यात आली.
पाण्याचे कराल संरक्षण, वसुधरेचे होईल रक्षण
आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा
हरित सण साजरे करा!
मुख्याधिकारींचे आवाहन
“पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी यापुढेही अशाच प्रकारे पर्यावरणपूरक सण साजरे करून समाजासाठी आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले.



















