वडगाव नगरपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासकामांच्या अहवालाचे ग्रामदैवत पोटोबा महाराज चरणी अर्पण
वडगाव │ वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील कार्यकाळातील सर्व विकासकामांचा सविस्तर अहवाल तयार करून तो प्रथम वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातांच्या चरणी अर्पण केला आहे. या धार्मिक विधीनंतर हा विकास अहवाल घराघरांत पोहोचविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अबोली मयूर ढोरे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी दिली.
उमेदवारांनी सांगितले की, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहराला विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून रस्ते-विकास, पाणीपुरवठा सुधारणा, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक सुविधा, सभामंडप, सामाजिक व सांस्कृतिक प्रकल्प आदी अनेक कामांना या निधीचा थेट लाभ झाला. या सर्व कामांचा तपशील ‘विकास अहवालात’ समाविष्ट करण्यात आला आहे.
अहवालाचे ग्रामदैवत चरणी अर्पण केल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांच्या भेटी घेऊन हा अहवाल थेट त्यांच्या हातात देणार आहेत. यामधून मागील पाच वर्षातील प्रगती पारदर्शक पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणुकीची रणधुमाळी तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमामुळे प्रचाराला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.




















