वडगाव मध्ये राजे शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन
वडगाव मावळ : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन मंगळवार ३ मार्च २०२६ ते शुक्रवार ६ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले असून विविध पारंपरिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
महोत्सवाचे अध्यक्ष कुलदीप ढोरे, कार्याध्यक्ष संतोष भिलारे असून कार्यक्रम प्रमुख म्हणून संतोष चव्हाण, रोहित गिरमे आणि गणेश वहिले काम पाहत आहेत. सचिव अमोल ठोंबरे, खजिनदार अतुल म्हाळसकर तर संपर्क प्रमुख म्हणून नगरसेवक संदीप म्हाळसकर कार्यरत आहेत.
महोत्सवाची सुरुवात मंगळवार ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक आणि मर्दानी खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “मानाची दगडी गोठी उचलणे” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी विशेष “खेळ रंगला पैठणीचा” हा आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
गुरुवार ५ मार्च रोजी आझाद महाराज गुजर यांचे कीर्तन होणार असून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
महोत्सवाची सांगता शुक्रवार ६ मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याने होणार आहे. त्याचबरोबर महिला कलाकारांच्या सादरीकरणातून “जागर स्त्रीशक्तीचा – उत्सव परंपरेचा” हा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार आहे.
या चार दिवसीय महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.























