
३१०० महिलांची भव्य अक्कलकोट दर्शन यात्रा : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते सुनील भोंगाडे यांचा आदर्श सामाजिक उपक्रम मावळात चर्चेत
मावळ तालुका : मावळ तालुक्यात सामाजिक कार्याची गौरवशाली परंपरा असून, त्यात नव्याने प्रेरणादायी अध्याय जोडत समाजसेवक . व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते सुनील नाना भोंगाडे यांनी तब्बल ३१०० महिलांसाठी मोफत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन यात्रेचे भव्य आयोजन केले. श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.


महिलांना अध्यात्मिक उन्नतीची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या भक्तीभावाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या यात्रेचे नियोजन करण्यात आले. पहाटेपासूनच विविध गावांमधून महिलांना अक्कलकोटला घेऊन जाण्यासाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली. प्रत्येक बसमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, नाश्ता, वैद्यकीय मदत, सुरक्षा व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची स्वतंत्र टीम अशी उत्तम सुविधा देण्यात आली होती. उपस्थितीचा आकडा मोठा असूनही संपूर्ण व्यवस्थापन शिस्तबद्ध आणि सुगम पार पडल्याने महिलांकडून मोठी प्रशंसा व्यक्त करण्यात आली.
इंदोरी पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार तसेच मावळातील लोकप्रिय नेतृत्व असलेल्या आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून गेल्या वीस वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले सुनील भोंगाडे यांनी हा उपक्रम राबविला. त्यांच्या संघटन क्षमतेचे आणि महिलांसाठी असलेल्या संवेदनशील दृष्टीकोनाचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.


अक्कलकोट येथे पोहोचताच महिलांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्शनाच्या क्षणी अनेक महिलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, तर काहींनी प्रथमच अशा यात्रेचा सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त केला. मंदिरात आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन महिलांनी अध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.
“ही जीवनातील अविस्मरणीय संधी होती”, “मनाला वेगळीच शांतता लाभली”, “स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
यात्रेनंतर बोलताना सुनील भोंगाडे म्हणाले,
“समाजातील महिलांना अध्यात्माशी जोडणे, त्यांच्या मनाला बळ देणे आणि त्यांना सुरक्षित व सुसज्ज प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा माझा मुख्य हेतू होता. इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी श्रद्धेने सहभाग घेतला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळातही महिलांसाठी आणखी उपक्रम राबवण्याचा मानस आहे.”


यात्रेदरम्यान स्वयंसेवकांनी अतिशय काटेकोर आणि संवेदनशील भूमिका बजावली. प्रत्येक गावातील महिलांना घरच्याप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष लक्ष देण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास, अडथळा किंवा गोंधळ निर्माण झाला नाही. महिलांनीही शिस्त, एकोप्याची भावना आणि आनंदी वातावरण ठेवत यात्रा अत्यंत सुरळीत पूर्ण केली.
अध्यात्म, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम साधत सुनील भोंगाडे यांनी मावळ तालुक्यात सकारात्मकतेचा आणि ऐक्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. ३१०० महिलांची ही अक्कलकोट दर्शन यात्रा मावळाच्या सामाजिक इतिहासात एक प्रेरणादायी नोंद ठरत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















