मावळ मध्ये सततच्या पावसामुळे भात पेरणी रखडली. शेतकरी वर्ग संकटात
मावळ तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या खरीप भात पिकांच्या रोपाची पेरणी रखडली आहे. यावर्षी पावसाने मावळ तालुक्यावर अवकृपा केली की काय असे म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. मान्सून पूर्व अवकाळी पावसाने संपूर्ण मे महिन्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता मान्सून पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची भात खाचरे पाण्याने तुडुंब भरल्याने पेरणीसाठी आवश्यक असलेल्या वाफसा स्थिती मिळालेली नाही. त्यामुळे भातासह इतर खरीप पिकांची ही पेरणी रखडलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या मोठ्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे डोंगर माथ्यावरून झरे. धबधबे भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या खाचरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून. विहिरी तलाव तुडुंब भरलेले आहेत.
मावळ तालुक्यातील धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असून पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मावळ तालुक्यातील शिवसेना पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच मावळ ऍग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी केली आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे=९९२१८०७०११



















