कामशेत मधील लब्धी छाजेड पवन मावळ मधून पहिलीच महिला CA होण्याची मानकरी
कामशेत : पवन मावळ परिसरातील कामशेत येथील लब्धी छाजेड हिने मे २०२५ मध्ये झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अंतिम चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लब्धी ही पवन मावळमधील पहिली सनदी लेखापाल (CA) ठरली आहे.
लब्धीचे प्राथमिक शिक्षण लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. इयत्ता बारावीनंतरच तिने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली होती. तिने फाउंडेशन कोर्समध्ये २५६ गुणांनी यश मिळविले. तसेच इंटरमिजिएटच्या ग्रुप १ मध्ये २३८ आणि ग्रुप २ मध्ये ३१२ गुण मिळवत तिने पुढील टप्पा पार केला. अंतिम परीक्षेत तिने ग्रुप १ मध्ये १५९ आणि ग्रुप २ मध्ये १५८ असे एकूण ३१७ गुण मिळवत अंतिम यश संपादन केले. या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे लब्धीने शेवटी अंतिम परीक्षा यशस्वीरित्या पार करत सनदी लेखापाल होण्याचा मान मिळवला.
लब्धीच्या यशामागे तिच्या आई विमल छाजेड, वडील जगदीश छाजेड, आणि संपूर्ण कुटुंबाचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. लब्धीनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “कुटुंबाच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि मेहनतीच्या जोरावर हे यश शक्य झाले.लब्धी छाजेड ही केवळ कामशेतच नव्हे तर संपूर्ण पवन मावळ भागातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे. तिचं हे यश अनेक तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणारे ठरेल. सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळवण्यासाठी लब्धी छाजेड ने दररोज सलग आठ तास अभ्यास केला. या संदर्भात बोलताना लब्धी चे वडील जगदीश छाजेड म्हणाले की मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही पवनानगर येथून कामशेतला स्थलांतरित झालो.लब्धी ने सनदी लेखापाल व्हावे हे आमचे स्वप्न होते. तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न वास्तवात आणले आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. अनेक मान्यवरांनी छाजेड यांच्या निवासस्थानी जाऊन लब्धी हिचे अभिनंदन केले आहे तसेच या उज्वल यशा बद्दल लब्धी छाजेड यांच्यावर संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११






















