किल्ले लोहगडावर सह्याद्री शाळेच्या स्काऊट गाईड पथकाचा पावसाळी ट्रेक
तळेगाव दाभाडे : शहरातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड पुणे यांच्या माध्यमातून एकदिवसीय पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आले. जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या किल्ले लोहगडावर हा ट्रेक पार पडला.
या भटकंतीत शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यशश्री आलम व ऋतुजा भेगडे या विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने उत्साहाने गड सर केला.
विद्यार्थ्यांना इतिहासाचा जवळून अनुभव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद आहे. त्यातीलच एक असलेल्या किल्ले लोहगडाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, इतिहासाशी प्रत्यक्ष नातं जोडता यावं तसेच गडकोटांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजिता थंपी यांनी दिली.
जिल्ह्यातील पंधरा शाळांचा सहभाग
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलसोबत पुणे जिल्ह्यातील पंधरा शाळांनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी योग्य ट्रेकिंग शूज, पावसाळी कपडे, पाण्याच्या बाटल्या, अन्नपदार्थ आणि आवश्यक साहित्य सोबत घेतले होते.
गड चढत असताना मार्गदर्शक शिक्षकांनी किल्ल्याचा समृद्ध इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्वांनी शिवमंदिर, पाण्याच्या टाक्या, धान्याचे कोठार (लक्ष्मी कोठी) आणि प्रसिद्ध विंचू काटा पाहिला. विशेष म्हणजे अवघड व रोमांचकारी अशा विंचू काट्यावर सर्व विद्यार्थी सुरक्षितपणे पोहोचले आणि तेथे सुंदर छायाचित्रे टिपली.
विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव
किल्ल्यावरची भटकंती विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. या ट्रेकमुळे शारीरिक व्यायामाबरोबरच संघभावना, आत्मविश्वास व नवीन ठिकाणे शोधण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये बळावल्याचे दिसून आले.
संस्थापक व पदाधिकाऱ्यांचे कौतुक
शाळेचे संस्थापक गणेश किसनराव भेगडे, अध्यक्ष सुनील बबनराव भेगडे व उपाध्यक्ष दत्तात्रय पंढरीनाथ नाटक यांनी या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
त्यांनी सांगितले की – “जागतिक वारसा स्थळांना भेट देणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि निसर्गाचा गौरव अनुभवणे होय. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून नवी ऊर्जा व प्रेरणा घ्यावी.”
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)






















