मावळ तालुक्यातील आजीवली शाळेला पर्यावरण संवर्धनाबद्दल सन्मान
मावळ (प्रतिनिधी): पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आजीवली हिला Environment Conservation Association (ECA) तर्फे नुकताच गौरव करण्यात आला. या सोहळ्यात शाळेला ट्रॉफी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, पर्यावरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय कुलकर्णी, तसेच सायन्स पार्कचे व्यवस्थापक श्री. प्रवीण तुपे उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून आजीवली शाळेने विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. त्यात –
वृक्षारोपण मोहिमा
कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक निर्मूलन
पाणी बचतीसाठी जनजागृती
सौरऊर्जेचा वापर
यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही तर गावकऱ्यांमध्येही पर्यावरणपूरक सवयी रुजल्या असून गावासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
कार्यक्रमात बोलताना तृप्ती सांडभोर म्हणाल्या, “शाळकरी मुलांच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबाबत जागृती पसरविण्याचे काम आजीवली शाळेने केले असून ही शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.” संजय कुलकर्णी यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून,
“या उपक्रमांचा व्याप आणखी वाढवावा, जेणेकरून मावळच नव्हे तर इतर तालुक्यातही अशा उपक्रमांना चालना मिळेल,” असे आवाहन केले. तर प्रवीण तुपे यांनी सायन्स पार्कमार्फत शाळेला तांत्रिक आणि शैक्षणिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी भावना व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका कमल खोत म्हणाल्या,
“हा सन्मान केवळ शाळेपुरता मर्यादित नसून यात सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. या यशामागे सर्वांचे सामूहिक प्रयत्न आहेत.”
गावाचा अभिमान वाढवणारा सन्मान
शाळेच्या या यशामुळे शिक्षक व विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सन्मानामुळे संपूर्ण आजीवली गावाचा अभिमान वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.






















