तळेगावातील रस्त्यावरील खड्डे आचारसंहितेपूर्वी बुजवा – सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
तळेगाव दाभाडे: तळेगाव स्टेशन परिसरातील नगरपरिषद हद्दीतील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना व नागरिकांना मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वपक्षीय कृती समितीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे. विशेषतः सिंडिकेट बँक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाचे संपूर्ण डांबरीकरण करणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.
नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात पुढील बाबींचाही समावेश आहे – रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा. दुकानदारांच्या समोर असलेली अनधिकृत शेड व बांधकामे हटवावीत. हातगाडी व टपरीधारकांना इतरत्र जागा उपलब्ध करून देऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा.

यशवंत नगर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील वाहतूक नियमन करावे; रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंग व अतिक्रमणांवर कारवाई करावी.
कृती समितीने नगरपरिषदेला ३० दिवसांचा अवधी देत सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या कालावधीत उपाययोजना न झाल्यास, तळेगाव शहरातील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
माजी नगरसेवक अरुण माने, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस .कल्पेश भगत, प्रा. नितीन फाकटकर, चिराग खांडगे, सुनील मोरे, नितीन जांभळे, सचिन देशपांडे, माजी नगरसेवक सचिन टकले, संतोष शिंदे व दीपक कारके यांनी निवेदनावर सही केली आहे.
अरुण माने, मिलिंद अच्युत व कल्पेश भगत यांनी सांगितले की, तळेगाव-चाकण रस्त्याप्रमाणेच तळेगाव शहरातील सर्व खड्ड्यांचे पूर्ण डांबरीकरण होईपर्यंत सर्वपक्षीय कृती समिती याचा पाठपुरावा करणार आहे
.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















