
आचारसंहिता लागू; तळेगावात फलक, बॅनर हटवण्यास सुरुवात
तळेगाव दाभाडे : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील चौकाचौकांत लावण्यात आलेले राजकीय फलक, बॅनर, पोस्टर काढण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.


निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता दिनांक ४ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या नेत्यांचे शुभेच्छापत्र, वाढदिवसाचे फलक, विविध कार्यक्रमांचे बॅनर, तसेच पक्षचिन्हांसह लावलेले प्रचारफलक हटवण्याची मोहीम नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले फलक हटवण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कामाला सुरुवात केली. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था व नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने हे फलक काढण्यास मदत केली.


आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकण्यासाठी किंवा प्रचारासाठी फलक, पोस्टर, बॅनर लावणे अनुचित ठरते. त्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता राखत हे फलक हटवले जात आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरिष दापकेकर यांनी सांगितले की, “आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाचे प्रचारफलक, शुभेच्छा बॅनर किंवा व्यक्तींचे वाढदिवस फलक लावणे योग्य नाही. नियमभंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.


शहरात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने राजकीय वातावरणही आता निवडणुकीच्या तयारीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















