
इंदोरी येथे भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
इंदोरी(मावळ) :मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, इंदुरी पंचायत समिती गणातील शेतकरी बांधवांसाठी श्री. सुनील नाना भोंगाडे यांच्या आयोजनातून भव्य शेतकरी मेळावा शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


पंचायत समिती इंदुरी गणामध्ये गेले अनेक वर्षे शेतकरी म्हणून कार्यरत असलेले सुनील नाना भोंगाडे यांनी आजवर शेतकरी व समाजासाठी विविध उपयुक्त उपक्रम राबवले आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात पंचायत समिती मावळ तसेच कृषी अधिकारी साळे साहेब, पाटील मॅडम, घोडेकर मॅडम यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. शेतीसाठी आवश्यक फवारणी पंप, कोळपणी यंत्र, विळा, खुरपे यांसह टोमॅटो, वांगी, मिरचीची सुमारे १० हजार रोपे व तणनाशक फवारणी औषधे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आली. याचा लाभ इंदुरी गणातील सुमारे ७०० शेतकऱ्यांनी घेतला.


या मेळाव्यास तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनरावजी भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनरावजी भोंगाडे, मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, इंदुरीचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक (पाटील,) ज्येष्ठ नेते बजरंग जाधव, प्रशांतदादा भागवत, सरपंच पल्लवीताई दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी इंदुरी गणातील दहा शेतकऱ्यांची ‘कृषीनिष्ठ शेतकरी’ म्हणून निवड करून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही मोफत भेटवस्तू देण्यात आल्या.
सुमारे १२०० ते १३०० शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचेही सुयोग्य नियोजन सुनील नाना भोंगाडे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.


निस्वार्थ भावनेतून, शेतकरी पुत्र म्हणून आयोजित केलेला हा मावळातील सर्वात मोठा भव्य-दिव्य शेतकरी मेळावा अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. शेतकऱ्यांप्रती दाखवलेली आपुलकी, मार्गदर्शन व सेवा ही सुनील नाना भोंगाडे यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद ठरेल, अशी चर्चा परिसरात होती.
भविष्यातही शेतकरी बांधवांसाठी असेच समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा विश्वास सुनील नाना भोंगाडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या या शेतकरी पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















