
गोल्डन रोटरीच्या सायकलथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे : येथील रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गोल्डन रोटरी सायकलथॉन 2026” हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीला शहरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमाला नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील व नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. “माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शपथ घेऊन सकाळी ७ वाजता नगराध्यक्षांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकलथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण व व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत “स्वच्छ, सुंदर व हरित तळेगाव” या संकल्पनेचा संदेश दिला.


या सायकलथॉनमध्ये सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. रोटरी क्लबचे डी.जी. इलेक्ट (२०२६–२७) नितीन ढमाले यांनी गोल्डन रोटरीच्या उपक्रमांचे विशेष कौतुक करत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व पर्यावरणाबाबत जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.


कार्यक्रमासाठी ब्रह्मा असोसिएट्सचे अजय बवले आणि वास्तु डेव्हलपर्सचे निलेश भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर दिपक फल्ले यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोल्डन सायकल प्रोजेक्ट चेअरमन रो. हर्षद जव्हेरी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष संतोष परदेशी यांनी मांडले, तर उपाध्यक्ष प्रशांत ताए यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी व रोटरॅक्ट सदस्यांसह स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. रोटरॅक्टचे अध्यक्ष ललित देसले यांचीही उपस्थिती होती.

एकूणच, तळेगाव दाभाडे शहरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या सायकलथॉनला भरभरून प्रतिसाद देत उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















