ओवळे ग्रामपंचायतीने जुलै 2025 मध्ये घेतलेली ग्रामपंचायत कर्मचारी/शिपाई भरती प्रकिया रद्द करा
ओवळे : ग्रामपंचायतीने जुलै 2025 मध्ये घेतलेली ग्रामपंचायत कर्मचारी/शिपाई भरती प्रकिया रद्द करून पुन्हा नव्याने घेण्यात यावी.योग्य ती कार्यवाही न केल्यास 15 ऑगस्ट 2025 रोजी मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.असे लेखी निवेदन आज मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान साहेब यांना ओवळे गावचे सा.कार्यकर्ते अजित शिंदे यांनी दिले.
ओवळे ग्रामपंचायतीने जुलै 2025 मध्ये दि.25/6/2025 रोजी मासिक सभेत ग्रा.कर्मचारी भरती करायची आहे असा ठराव केला.व लगेच 4 ते 5 दिवसांत ग्रामपंचायत कर्मचारी भरतीची जाहिरात काढली.30/6/2025 ते 6/07/2025 ह्या कालावधीत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले.व दि.17/7/2025 रोजी ज्यांनी ह्या पदासाठी अर्ज केले होते त्यांची ओवळे गावातील जि.प.प्राथमिक शाळेत लेखी परीक्षा घेऊन ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांची ओवळे ग्रामपंचायत कर्मचारी/शिपाई पदी निवड करण्यात आली.
परंतु ओवळे ग्रामपंचायतीने जी जाहिरात काढली होती.ती जाहिरात उशिरा काढण्यात आली.तसेच ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना कमी वेळ देण्यात आला.ह्या पदासाठी अर्ज करण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती.ते कागदपत्र दिलेल्या कमी वेळात न मिळाल्याने अनेकांना ह्या भरतीप्रकियेसाठी अर्ज करता आले नाही.ह्या भरतीप्रकियेसाठी अर्ज करताना जे अधिवास प्रमाणपत्र लागत होते.ते मिळवण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात.आणि ग्रामपंचायतीने अर्ज करण्यासाठी फक्त 7 ते 8 दिवसच वेळ दिला होता.व जी जाहिरात प्रसिद्ध केली होती ती देखील अर्ज करण्याच्या दिवसांच्या 2 दिवस आधीच
ग्रामपंचायतीच्या सुचनाफलकावर लावण्यात आली होती.मग इतक्या कमी वेळात कागदपत्रे आणायची कोठुन? अशी अडचण अनेकांना झाली.तसेच ज्यांनी ह्या पदासाठी अर्ज केले होते. त्यांनी अर्जासोबत जोडण्यासाठी इतक्या कमी वेळात अधिवास प्रमाणपत्र कोठुन आणले? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
ओवळे ग्रामपंचायतीने ही जाहिरात 10 ते 15 दिवस आधी जाहीर करायला पाहिजे होती.व ह्या पदासाठी अर्ज करण्यासाठी 15 ते 20 दिवस वेळ देणे आवश्यक होते.पण ओवळे ग्रामपंचायतीने तसे केले नाही.त्यामुळेच ह्या भरतीप्रकियेपासुन अनेकांना वंचित रहावे लागले आहे.अशी तक्रार ओवळे गावचे सा.कार्यकर्ते अजित शिंदे यांनी मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान साहेब यांच्याकडे केली आहे.
तसेच ओवळे ग्रामपंचायतीने जुलै 2025 मध्ये घेतलेली भरती प्रक्रिया व केलेली ग्रा.कर्मचारी निवड रद्द करावी. व पुन्हा नव्याने ही भरती प्रक्रिया व ग्रा. कर्मचारी निवड करण्यात यावी.आणि लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास दि.15 ऑगस्ट 2025 रोजी मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन बीडीओंना देण्यात आले आहे.




















