तळेगावात सकाळच्या धुक्याची चादर – वातावरणात गारवा वाढला
तळेगाव दाभाडे : आज सकाळी तळेगाव शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासून हवामानात अचानक बदल जाणवू लागला व शहरातील रस्ते, घरे, झाडे, वाहनांसमोर पांढऱ्या धुक्याचे आच्छादन दिसू लागले. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत होते, त्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू होती.
धुक्यामुळे फक्त पंधरा ते वीस फूटापर्यंतच दृश्य दिसत होते. सकाळी फिरायला जाणारे नागरिक, शाळकरी मुले व कामानिमित्त बाहेर पडणारे लोक धुक्यातून वाट काढताना दिसून आले.
पावसाळ्याचा परिणाम
यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला असून सप्टेंबरपर्यंत तो कायम आहे. मागील चार महिन्यांपासून नागरिकांना कडक उन्हाचा अनुभव आलेला नाही. मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे वर्षभर पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र, उन्हाळा कडक झाला तर पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठा कमी होण्याची शक्यता नेहमीच असते. तरीदेखील तळेगाव परिसरात पूर्वी कधीही तीव्र पाणीटंचाई जाणवली नसल्याचा अनुभव नागरिक मांडतात.
थंडीचा वेध
आज सकाळपासूनच गारठा जाणवत असून, “यंदा थंडी लवकरच येते का?” असा प्रश्न अनेकांच्या चर्चेत होता. सध्या पितृपक्ष सुरू असून त्यानंतर अश्विन महिना व दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, “यंदा दिवाळीत पूर्वीप्रमाणे कुडकुडणारी थंडी पडण्याची शक्यता आहे.”
आरोग्याचा प्रश्न
अचानक वाढलेल्या गारवामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत. लहान मुले, वृद्ध व आजाराने त्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















