नगरपरिषद निवडणुकीपूर्वी तळेगाव दाभाडेत मतदार यादीवर गोंधळ .३९२० हरकती दाखल
तळेगाव दाभाडे : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदारांच्या प्रारूप यादीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत. १७ ऑक्टोबर हा हरकती नोंदविण्याचा अखेरचा दिवस ठरविण्यात आला होता आणि या मुदतीपर्यंत तब्बल ३,९२० हरकती दाखल झाल्या आहेत. शहरातील सर्वच १४ प्रभागांमधून या हरकती दाखल झाल्या असून, मतदार यादीतील त्रुटींबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.

नगरपरिषदचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरकतींसोबत रहिवाशी पुरावे जोडणे आवश्यक आहे. कोणत्याही हरकतीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही; मात्र सबळ पुरावे नसलेल्या किंवा अपूर्ण अर्जांची छाननी करून ते निकाली काढले जातील.असे त्यांनी स्पष्ट केले.


प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचना मागविण्यासाठी सुरुवातीला १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र नागरिकांच्या मागणीवरून ती वाढवून १७ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले की, विना आक्षेप कुणाचेही नाव यादीतून वगळले जाणार नाही, तसेच कोणत्याही नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावला जाणार नाही.
दरम्यान, अनेक नागरिकांनी निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रारी दाखल करून मतदार यादीतील त्रुटी त्वरित दूर करण्याची मागणी केली आहे. काही प्रभागांमध्ये एका कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत नोंदवली गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. काही मतदारांचे पत्ते चुकीचे नोंदले गेल्याचीही प्रकरणे लक्षात आली आहेत. परिणामी, आपले नाव मूळ प्रभागात समाविष्ट करण्यासाठी नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.


शहरातील काही भागांमध्ये मतदार यादीतील गोंधळामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. “माझे नाव गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये होते, पण यावेळी आठव्या प्रभागात दाखवले आहे,” अशी तक्रार अनेकांनी नोंदवली. यामुळे नागरिकांना नाव शोधताना अडचणी येत आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता या सर्व हरकतींची छाननी करून अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय याद्या देखील नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध केल्या जातील.


तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक स्थानिक राजकीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव यादीत योग्यरित्या नोंदवले जाणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता प्राप्त हरकतींची सखोल छाननी करून मतदार यादीतील गोंधळ दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















