
निसर्गाचा कोप आणि प्रशासनाची तत्परता — मावळात नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग
मावळ तालुक्यात निसर्गाने यंदा पुन्हा एकदा आपला रौद्र अवतार दाखवला. अवकाळी पावसाच्या अनाहूत हजेरीने शेतकऱ्यांची स्वप्नं भिजून गेली, तर अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतमालाचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भरघोस पीक घेण्याच्या उंबरठ्यावर असताना अचानक कोसळलेल्या पावसाने अनेकांचे संसारच उद्ध्वस्त केले. नांगरावर विसावलेल्या मातीत पिकांचा सुगंध नव्हे, तर ओलसर दु:ख दाटून आलं आहे.


या संकटात प्रशासन मात्र सज्ज आहे. नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करण्यासाठी तहसीलदार विक्रम देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी मारुती साठे यांनी तातडीने संयुक्त पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचा समावेश असून, ते थेट गावागावात जाऊन नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहेत.
तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील १८८ गावांमध्ये पडझडीची, शेतमालाची, घरांची तसेच जीवितहानीची प्रकरणे नोंदली गेली आहेत. ही पथके केवळ नुकसान नोंदविण्यात न थांबता, प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवतील, अशी खात्री दिली गेली आहे. नुकसान झालेल्या जमिनींचे, पिकांचे, तसेच जनावरांचे पंचनामे करून त्यांचे अहवाल तहसील कार्यालयात सादर केले जातील.




याचबरोबर, राज्य सरकारने दिलेल्या नव्या आदेशानुसार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि परिपेक्षीय अधिकारी यांना पंचनाम्यांच्या नियंत्रण आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक पर्यवेक्षक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील पंचनाम्यांपैकी किमान २५ टक्के पंचनामे तपासतील आणि त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करतील.
तहसीलदार देशमुख आणि कृषी अधिकारी साठे यांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत “कोणतीही ढिलाई किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. जनतेचे दु:ख कमी करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने पूर्ण दक्षता घ्यावी.” अन्यथा, अशा कर्मचाऱ्यांवर केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मावळात आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा आहे, पण प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आशेचा किरणही दिसू लागला आहे. ज्या हातांनी मातीतून सोनं निर्माण केलं, तेच हात आता आपल्या हक्काचा न्याय मागत आहेत आणि प्रशासन त्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे.
निसर्गाचा कोप थांबवता येत नाही, पण त्याने निर्माण केलेल्या जखमा भरून काढणं शक्य आहे आणि मावळात प्रशासनाचा तो प्रयत्न सध्या पूर्ण वेगाने सुरू आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















