
मावळातील कोंडीवडे गावात बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला, वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी
कामशेत:मावळ तालुक्यातील टाकवे कोंडीवडे(आंदर मावळ) गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असून, बुधवारी पहाटे बिबट्याने थेट वस्तीच्या जवळ येत शेतकरी सोपान गोपाळ तळवडे यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.


कोंडीवडे हे जंगलालगत असलेले गाव असल्याने वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून जाणवत असतो. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्याचे वारंवार दर्शन आणि आता थेट पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक शेतकरी रात्री शेतावर जाणे टाळत असून, महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “आज कुत्र्यांवर हल्ला झाला, उद्या माणसांवर होऊ नये,” अशी चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.


या घटनेनंतर शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान, या संदर्भात बोलताना वनाधिकारी कवडे मॅडम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “गावकऱ्यांनी रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.


कोंडीवडे गावातील नागरिक आता वनविभागाच्या तातडीच्या उपाययोजनांकडे आशेने पाहत आहेत.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















