कामशेत-गोवित्री रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या हाल : अपघाताचा धोका वाढला
नाणे (ता. मावळ) : कामशेत-गोवित्री या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे आणि पावसाळ्यात त्यामध्ये साचणारे पाणी यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे जाणारे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने प्रवास करतात. शालेय बससह खाजगी वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावरील खोल खड्डे टाळताना अनेक वेळा वाहनांचे अपघात झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात खड्डे लक्षात न आल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. इतकेच नाही तर या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून चालकांना तारेवरची कसरत करत गाडी चालवावी लागत आहे.
या रस्त्याकडे संबंधित विभागाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी आहे. गोवित्री, कांब्रे, थोरण, कोळवाडी, वळवंती, कोंडीवडे आणि जांभवली परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी सातत्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आमदार सुनील शेळके यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११



















