प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनतर्फे टी-शर्ट वाटप
मावळ : खो-खो हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि संघभावनेचा खेळ आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनतर्फे प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे नवे संचार झाले असून आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे.
या कार्यक्रमास प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महादेव ढाकणे सर, क्रीडा प्रमुख नाईकरे सर, कदम सर, मिंडे सर, मकर सर, शिंदे सर, कर्डीले मॅडम, चव्हाण मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे खो-खो प्रशिक्षक सुधीर शिवेकर, वसीम तांबोळी, विठ्ठल पवार, विशाल चव्हाण यांनी खेळाडूंना आगामी स्पर्धेत मार्गदर्शन करून उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना प्रशांत दादा भागवत म्हणाले, > “खो-खो हा आपला पारंपरिक खेळ असून मुलांनी यातून संघभावना, शिस्त आणि चिकाटी शिकणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून पुढे यावे, यासाठी आमच्या फाउंडेशनतर्फे नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंनी आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे तसेच मावळ तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आहे.”
टी-शर्ट वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “प्रगती विद्यामंदिरचे खेळाडू केवळ तालुकास्तरीय नव्हे तर जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेतही नावलौकिक मिळवतील आणि परिसराचे नाव उज्वल करतील,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रगती विद्यामंदिरचे सर्व शिक्षकवर्ग, पालक तसेच प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनचे सहकार्य लाभले. त्यामुळे शाळेच्या खेळाडूंमध्ये नवी उमेद, उत्साह आणि जिद्द निर्माण झाली आहे.




















