वडगाव मावळ येथे सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प : “नियोजनानेच मिळते यश” – बानगुडे-पाटील
वडगाव मावळ : मावळ विचार मंच आयोजित रौप्यमहोत्सवी सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना व्याख्याते मा. नितीन बानगुडे-पाटील यांनी “नियोजन आणि चिकाटी या दोन गोष्टींच्या जोरावर यश मिळते,” असा ठाम संदेश दिला.
ते म्हणाले, “एवढीशी मुंगी, एवढासा मेंदू, तरी ती आपले देह गाटते. मग माणसाने जर नीट नियोजन करून काम केले, तर यश हे हमखास मिळते.” आज शेतकरी आत्महत्या करतात, तसेच अनेक तरुण देखील नैराश्यामुळे जीवन संपवतात, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत बानगुडे-पाटील पुढे म्हणाले की, “महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य उभं केलं. रायगडासारख्या किल्ल्यांची बांधणी असो, पहिले आरमार उभे करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय असो, किंवा कोंडाणा जिंकण्यासाठी केलेले धोरणात्मक नियोजन – प्रत्येक ठिकाणी त्यांनी नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आजच्या तरुणांनीही हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.”
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, श्री पोटोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, भाजपाचे सरचिटणीस रामदास गाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, मंचाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, यावर्षीच्या समितीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे, आरती राऊत, सचिव गिरीश गुजरानी, खजिनदार संतोष भालेराव, प्रसिद्धी प्रमुख अतुल म्हाळसकर आदींनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला परिसरातील बंधू-भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.




















