कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयाला शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा ‘उत्कृष्ट’ दर्जा
तळेगाव दाभाडे – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सादर करण्यात आलेल्या संस्थात्मक सर्वेक्षण अहवालात इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कृष्णराव भेगडे डी.फार्मसी महाविद्यालयास “उत्कृष्ट” दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

हा बहुमान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष संजय साने, खजिनदार निरुपा कानिटकर, आणि गोरख काकडे यांनी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
दरवर्षी तंत्रशिक्षण मंडळामार्फत नेमण्यात येणाऱ्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे हे सर्वेक्षण केले जाते. या पथकाने महाविद्यालयास भेट देऊन खालील बाबींचा सविस्तर आढावा घेतला –

शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज
आधुनिक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय
रुग्ण समुपदेशन सेवा
पायाभूत सुविधा आणि संगणक कक्ष
पालक सभा, औद्योगिक भेटी
विद्यार्थ्यांचे निकाल आणि शैक्षणिक सहली
ग्रीन कॅम्पस, गुणवत्तापूर्ण वसतिगृह सुविधा
नोकरी मेळावे आणि नामांकित कंपन्यांचे सहभाग
या सर्व बाबींमध्ये महाविद्यालयाने सातत्यपूर्ण गुणवत्ता दाखवली असून त्यामुळेच त्यास “उत्कृष्ट” दर्जा बहाल करण्यात आला, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे आणि डी.फार्मसी विभागप्रमुख डॉ. गुलाब शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत भाष्य केले. “भारतीय औषध निर्यात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३०.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून भारताचा जागतिक औषध बाजारपेठेतील हिस्सा ५.९२% आहे. तसेच, जगभरात पुरवल्या जाणाऱ्या लसींपैकी ६५–७०% लस भारत पुरवतो,” असे त्यांनी सांगितले.
फार्मसी शिक्षणातील वाढती मागणी लक्षात घेता संस्थेमार्फत तळेगाव येथे डी.फार्म, बी.फार्म आणि एम.फार्म हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पुढील वर्षांपासून पीएच.डी. सारखा संशोधनाधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे, असेही काकडे यांनी नमूद केले.
या उल्लेखनीय यशासाठी प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















