तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
७६१ कोटी १७ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; मावळच्या विकासयात्रेला मिळणार नवसंजीवनी
तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यात एकूण ७६१ कोटी १७ लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, यादवेंद्र खळदे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आणि पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

तळेगाव नगरपरिषदेची नवी इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून एकूण ४० कोटी रुपये खर्च या बांधकामावर करण्यात आला आहे. यापैकी २७ कोटी सिव्हिल वर्क, ८ कोटी फर्निचर, तर ५ कोटी विद्युत कामांसाठी वापरण्यात आले आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता राम सरगर यांनी दिली.
ही चार मजली वास्तू प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी आदर्श ठरेल. पहिला मजला: कर, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत आणि अग्निशमन विभाग. दुसरा मजला: नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कक्ष, कॉन्फरन्स हॉल. तिसरा मजला: बांधकाम, नगररचना, लेखा व मुख्याधिकारी कक्ष. चौथा मजला: संगणक व शिक्षण विभाग, पंचकोनी डुप्लेक्स सभागृह आणि पत्रकार बाल्कनी.

या इमारतीचे सविस्तर नियोजन व मार्गदर्शन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
या सोहळ्यात ७७ कोटी ५४ लाखांच्या लोकार्पण कामांसह ६८३ कोटी ६३ लाख रुपयांच्या भूमिपूजन कामांचा शुभारंभ होणार आहे.
लोकार्पणाच्या प्रमुख कामांमध्ये:
तळेगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारत – ₹४० कोटी
श्री शिवशंभू स्मारक तीर्थ – ₹१ कोटी ७१ लाख
लोणावळा शहरी व ग्रामीण पोलीस स्टेशन – ₹१० कोटी ९३ लाख
गहुंजे-साळुंब्रे पूल – ₹१४ कोटी १५ लाख
वडेश्वर आदिवासी आश्रमशाळा – ₹१० कोटी ७५ लाख
भूमिपूजनाच्या प्रमुख कामांमध्ये:
कुरवंडे लायन्स व टायगर पॉइंट रस्ता – ₹१८४ कोटी
देहू–येलवाडी रस्ता कॉक्रीटीकरण – ₹१२५ कोटी
चाणक्य एक्सलन्स सेंटर, कार्ला – ₹४२ कोटी ७० लाख
वडगाव पाणीपुरवठा योजना – ₹४० कोटी
तिकोना–तुंग–राजमाची किल्ले रस्ते – ₹३८ कोटी
तसेच जिल्हा वार्षिक योजना व PMRDA अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉक्रीटीकरण

या लोकार्पण सोहळ्यामुळे मावळ तालुक्याच्या विकासयात्रेला नवसंजीवनी मिळणार असून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ही नवी वास्तू भविष्यातील जनसेवेचे केंद्र ठरणार आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून साकारलेला हा भव्य प्रकल्प मावळकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून या दिवशी तळेगाव शहर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करणार आहे.
















