
परतीच्या पावसाने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल भात पिकाचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता आणि हताशा
कामशेत : मावळ तालुका सध्या परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही मावळ तालुक्यात सुमारे १२,६०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. भात शेती हा या भागातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पण या वर्षी निसर्गाने पुन्हा एकदा आपली रौद्र रूप दाखवत शेतकऱ्यांचे सर्व स्वप्न पाण्यात वाहून नेले आहे.
काही शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली होती, तर काही शेतकऱ्यांचे पिक अजून शेतात उभेच होते. पण अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे उभे असलेले पिक कुजण्याच्या मार्गावर आहे. कापलेले भात ओले होऊन खराब झाले आहे, तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे धानाचे गंजी वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.


या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटले आहेत. वर्षभर काबाडकष्ट करून उभे केलेले पीक एका आठवड्याच्या पावसाने उद्ध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या शेतात उभा राहून डोळ्यांत अश्रू घेऊन आपले उध्वस्त झालेले पीक पाहत आहे. काहींनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, घरखर्च कसा भागवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन हे भात पिकावरच अवलंबून असते. त्यामुळे या नुकसानीने त्यांच्या आयुष्यावर मोठा आर्थिक आणि मानसिक आघात झाला आहे. गावागावांत आता हताशा आणि नैराश्याचे वातावरण पसरले आहे.


शेतकऱ्यांच्या या हालअपेष्टांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी सर्वत्र मागणी होत आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
स्थानिक शेतकरी सांगतात की, “वर्षभर जीव तोडून शेती केली, खतं, बियाणं, मजुरी या सगळ्यावर खर्च केला. आता जेव्हा हातात काही येणार होतं, तेव्हाच हा पाऊस आला आणि सगळं उद्ध्वस्त झालं.”
मावळातील शेतकऱ्यांचे हे शब्द ऐकून कोणाचेही हृदय पिळवटून जाईल. या परतीच्या पावसाने फक्त शेतमाल नाही तर शेतकऱ्यांची मनोवस्था देखील कोसळली आहे. आता साऱ्यांची नजर शासनाकडे लागली आहे .
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















