वडगाव बाजारपेठेत मृणाल म्हाळसकर यांची व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भेट; विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या
वडगांव नगरपंचाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत व्यापारी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची सखोल माहिती घेतली.
म्हाळसकर या भेटीदरम्यान विविध दुकाने, व्यावसायिक केंद्रे यांना भेट देत व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करताना दिसल्या. त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा त्यांच्या दुकानात जाते, तेव्हा ते फक्त ग्राहक किंवा मतदार नसतात; ते वडगांव कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कष्टाची नितांत उमेद पाहून मला ऊर्जा मिळते.”
बाजारपेठेतील पायाभूत सुविधा, पार्किंगची समस्या, स्वच्छता, सुरक्षाविषयक उपाययोजना, छोटे-मोठे व्यवसाय सुलभ करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल अशा अनेक मुद्द्यांवर व्यापाऱ्यांनी आपली मते मांडली. संवादादरम्यान व्यापारी वर्गाने शहराच्या विकासात आपला सक्रीय सहभाग जाहीर केला.
म्हाळसकर यांनी आश्वासन दिले की, व्यापारीवर्ग हा वडगावच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या अडचणींचे समाधान आणि नियोजनबद्ध विकास हा त्यांच्या कार्यसूचीतील प्राधान्यक्रम असेल. “तुमच्या प्रत्येक गरजेत शहराच्या प्रगतीची नवी दिशा दडलेली आहे. तुमच्या सोयीसाठी मी सदैव तत्पर आहे,” असे त्या म्हणाल्या.
या संवाद भेटीमुळे निवडणूक वातावरणात व्यापारी वर्गातून सकारात्मक प्रतिसाद दिसत असून वडगांवच्या विकासासाठी विधायक चर्चा रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




















