

तळेगाव दाभाडे : पुणे–मुंबई जुन्या महामार्गावर तळेगाव दाभाडे शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या लिंब फाटा व वडगाव फाटा या दोन्ही ठिकाणी तातडीने उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनचालक व सामाजिक संघटनांकडून होत आहे. सव्वा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आणि ‘सेकंड होम’ म्हणून वेगाने विकसित होत असलेले तळेगाव दाभाडे शहर सध्या गंभीर वाहतूक कोंडी व अपघातांच्या धोक्याला सामोरे जात आहे. प्रशासनाने वेळीच ठोस निर्णय न घेतल्यास अपघातांची मालिका रोखणे अशक्य ठरेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.


उत्तम हवामान, निसर्गरम्य परिसर आणि ऑक्सिजनयुक्त वातावरणामुळे तळेगाव दाभाडे शहर पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागांतील नागरिकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. त्यातच तळेगाव व चाकण एमआयडीसीमुळे औद्योगिक विकास वेगाने झाला असून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. परिणामी शहराची लोकसंख्या व वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत रस्ते, उड्डाणपूल व सुरक्षित वाहतूक व्यवस्था याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
लिंब फाटा येथे सुशीला मंगल कार्यालयासमोरून तळेगाव शहरात प्रवेश करताना नागरिकांना पुणे–मुंबई जुना महामार्ग ओलांडावा लागतो. येथे कोणतीही उड्डाणपूल, अंडरपास अथवा सुरक्षित क्रॉसिंग व्यवस्था नसल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. याच ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


वडगाव फाट्याची परिस्थितीही तितकीच गंभीर आहे. उर्से खिंडीतून येणारी भरधाव वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ आणि अपुरी सिग्नल व्यवस्था यामुळे येथे दिवसरात्र वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका कायम आहे. मंत्रा सिटी ते मॅकडोनाल्ड परिसरात रस्ते विकास झाला असला तरी महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही उड्डाणपूल किंवा अंडरपास सुविधा नसल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कामशेतसारख्या तुलनेने लहान गावात उड्डाणपूल उभारण्यात आला असताना तळेगाव दाभाडे व वडगावसारख्या मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरांकडे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले उत्तर नागरिकांच्या नाराजीला कारणीभूत ठरले आहे. मुंबई–पुणे हमरस्त्याचे कंत्राट पूर्वीच्या सरकारने दिल्यामुळे मुदत संपेपर्यंत काही करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.


मात्र नियम व कंत्राटी अडचणींचे कारण पुढे करून लोकांचे जीव धोक्यात घालू नयेत, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. सरकारने तातडीने लिंब फाटा व वडगाव फाट्यावर उड्डाणपूल उभारून त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा, अशी ठोस मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















