मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल
वडगाव मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भव्य शक्तिप्रदर्शन करत सर्व उमेदवारांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक रणधुमाळीला जोरदार सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेसाठी टाकवे बुद्रुक–नाणे गटातून अनंता हनुमंत पावसे, वराळे–इंदोरी गटातून पल्लवी दाभाडे, खडकाळे–कार्ला गटातून दिपाली हुलावळे, कुसगाव बुद्रुक–काले गटातून संतोष गबळु राऊत, तर सोमाटणे–चांदखेड गटातून मनीषा नितीन मुर्हे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या यादीत महिला उमेदवारांचा सहभाग लक्षणीय असून, अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे दिसून येते.
पंचायत समितीसाठी टाकवे बुद्रुक गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड, नाणे गणातून आशा ज्ञानेश्वर मोरमारे, इंदोरी गणातून दिलीप नामदेव ढोरे, कार्ला गणातून रेशमा राजू देवकर, कुसगाव बुद्रुक गणातून योगेश मुरलीधर लोहार, काले गणातून शिला रामचंद्र कालेकर, सोमाटणे गणातून साहेबराव कारके, चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच खडकाळे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस–आरपीआय युतीकडून समीर खंडू जाधव, तर वराळे गणातून अतुल मराठे यांनीही आपले अर्ज भरले आहेत.
या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, एस.आर.पी.चे अध्यक्ष रमेश साळवे, आर.पी.आय.चे जेष्ठ नेते सूर्यकांत वाघमारे, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष नारायण भालेराव, दीपक हुलावळे, किशोर सातकर, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे, सारिकाताई शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “ही निवडणूक कोणत्याही एका उमेदवाराची नसून माझ्या माय-बहिणींची आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. एकजुटीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत उमेदवार व कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















