जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
तळेगाव दाभाडे : मागील काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक शाळांचे तसेच विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करत तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे संकलन करून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

शालेय पातळीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. “विना सहकार नाही उद्धार” या विचाराला साजेसा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून साकारला आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शाळांमधील पुस्तके, वही, पिशव्या, लेखनसाहित्य यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतःहून साहित्य संकलनाचा उपक्रम राबवला.

दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या सूचनेनुसार अल्पावधीत मोठ्या प्रमाणात साहित्य जमा केले. या मदतीतून विद्यार्थ्यांनी “मानवतेची खरी भावना म्हणजे परोपकार” या मूल्याला मूर्त रूप दिले आहे.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचा निश्चितच मोठा लाभ होणार आहे. कोणतीही आपत्ती आली तरी एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही पिढी भारतीय संस्कृतीचे जतन करत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व घटकांना आवाहन केले आहे की, “आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी जपत अशा मदतकार्यात सहभागी व्हावे” — हीच खरी शिक्षणाची दिशा आणि संस्कारांची ओळख आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















