दिवाळीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती; ८३ जणांचा अर्ज दाखल करून उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे :दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारीसाठी अर्ज मागविताच तब्बल ८३ इच्छुकांनी अर्ज दाखल करत पक्षाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रविवार, १९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीमार्फत या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तळेगाव येथे घेण्यात आल्या. शहरात दिवसभर निवडणुकीच्या चर्चांनी रंग चढवला होता. उमेदवार आपापल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे, महिला उमेदवारांचा सहभाग व उत्साह उल्लेखनीय होता.


या मुलाखतीनंतर आमदार सुनील शेळके यांनी सर्व इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच जनतेच्या कामात झोकून देण्याचे आवाहन केले. “पक्षावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी एकदिलाने काम केले, तर तळेगावात पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार,” असा आत्मविश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे. आघाडी किंवा युतीबाबत अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नसल्याने काही इच्छुक ‘कुंपणावर बसून’ परिस्थितीचा अंदाज घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या गोंधळात काही ‘छुपे उमेदवार’ आपले गणित मांडत आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.


दरम्यान, विरोधी पक्षांकडून अद्याप उमेदवारीसाठी अर्ज मागविण्याची किंवा मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलाखतींच्या या प्रक्रियेला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी . कृष्णा कारके, ज्येष्ठ नेते बाबूलाल नालबंद, कामगार आघाडीचे विजयराव काळोखे, माजी नगरसेवक दर्शनदादा खांडगे, अशोक भेगडे, तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड आदी मान्यवरांचा समावेश होता.


पक्षाच्या कोअर कमिटीने प्रत्येक इच्छुकाची पक्षनिष्ठा, कामगिरी, सामाजिक योगदान आणि जनाधार याचा सखोल आढावा घेतला. आगामी काही दिवसांत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात आता उत्सुकता आहे ती म्हणजे तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किती दमदारपणे उमेदवार उभे करते आणि विरोधक त्याला कसा मुकाबला करतात. दिवाळीच्या शुभसंधीला सुरू झालेल्या या राजकीय तयारीने तळेगावात निवडणुकीच्या रणशिंगाचा नाद खऱ्या अर्थाने झाला आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















