
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता — भाजपचा उमेदवार जाहीर,? राष्ट्रवादीकडून नावाची प्रतीक्षा
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा झेंडा यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये महिला नेतृत्वाला संधी देण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने आपला डाव टाकत मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांची उमेदवारी निश्चित ? असून, त्यांच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे.


मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. पक्षातील प्रमुख इच्छुकांमध्ये अबोली मयूर ढोरे, सुनीता दत्तात्रय कुडे आणि वैशाली पंढरीनाथ ढोरे या तीन महिला आघाडीवर आहेत. या तिन्ही इच्छुकांकडे स्थानिक पातळीवर समर्थकांचा गट असून, अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वडगाव नगरपंचायतीतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट आमनेसामने लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, काही प्रभावी महिला अपक्ष उमेदवार देखील मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही.


स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहेत, तर मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार?”, “अपक्ष उमेदवार येणार का?”, आणि “वडगावच्या नगराध्यक्षपदावर कोणाचा झेंडा फडकणार?” — हे तीन प्रश्न सध्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत असताना, वडगाव नगरपंचायतीची ही निवडणूक महिलांच्या नेतृत्वात नवा अध्याय लिहिणारी ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


प्रतिनिधी संजय दंडेल




















