
राव कॉलनीतील गार्डन अंधारात; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील राव कॉलनी परिसरात असलेले नगर परिषदेचे गार्डन सध्या अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अंधारात गेले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गार्डनमध्ये केवळ एकच हाय-मास्ट दिवा कार्यरत असल्याने उर्वरित परिसरात संध्याकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. परिणामी, नागरिकांना गार्डनचा वापर करणे धोकादायक ठरत आहे.


या गार्डनचा नियमित वापर ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच तरुण वर्ग करीत असतो. सकाळी व्यायामासाठी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अपुऱ्या प्रकाशामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात घसरून पडण्याची शक्यता वाढली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधाराचा फायदा घेत असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.


नगर परिषदेने नागरिकांच्या आरोग्य, व्यायाम व विरंगुळ्यासाठी हे गार्डन विकसित केले आहे. मात्र, मूलभूत सुविधांपैकी असलेली प्रकाशयोजना अपुरी असल्याने गार्डनचा उद्देशच धोक्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.


गार्डन परिसरात अधिक हाय-मास्ट दिवे उभारावेत किंवा विद्युत खांबांवर एलईडी दिवे बसवून संपूर्ण परिसर उजळून निघावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, रात्रीच्या वेळेस प्रकाशयोजना नियमित सुरू ठेवून देखभाल-दुरुस्ती करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. नगर परिषदेने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















