वडगाव शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेला भावपूर्ण प्रतिसाद
वडगाव मावळ : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेचे वडगाव शहरात आज भावनिक वातावरणात आगमन झाले. या यात्रेदरम्यान संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. “दादा अमर राहोत”च्या घोषणांनी वडगाव शहर भारावून गेले.
अस्थिकलश यात्रा शहरात दाखल होताच मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी जागोजागी थांबून अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अस्थिकलशाचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी नागरिकांनी अश्रूंनी डोळे भरून श्रद्धांजली अर्पण केली.
खंडोबा चौक परिसरात अस्थिकलश यात्रेला विशेष थांबा देण्यात आला. येथे आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगी पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेविका माया चव्हाण, नगरसेवक अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, अजय भवार, आकांक्षा वाघवले, रुपाली ढोरे, वैशाली सोनवणे, वडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अस्थिकलश यात्रेदरम्यान शहरात शांतता, शिस्त आणि श्रद्धेचे वातावरण दिसून आले. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या यात्रेच्या निमित्ताने वडगाव शहराने आपल्या लाडक्या नेत्याला अश्रूंनी व श्रद्धेने निरोप दिला.























