श्रद्धांजली म्हणून मावळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार
मावळ | प्रतिनिधी : ३ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मावळ तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे दिवंगत नेते आदरणीय अजित दादा यांच्या निधनानंतर संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. मात्र या दुःखाबरोबरच त्यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण आणि त्यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्याचा संकल्प मावळकरांकडून व्यक्त केला जात आहे.
मावळच्या सर्वांगीण विकासासाठी अजित दादांनी सातत्याने प्रयत्न केले. काम, निधी आणि निर्णयक्षमता या तीन मजबूत आधारांवर त्यांनी मावळचा कायापालट घडवून आणला. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मावळला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवत आता मावळकरांनी एक ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे.
अजित दादांच्या कार्याला खरी श्रद्धांजली देण्यासाठी मावळ तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा निर्णय कोणत्याही राजकीय स्वार्थातून नसून, मावळच्या विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी म्हणून घेतला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“विकासाची गती थांबू नये, मावळला मिळणारा निधी, योजना आणि निर्णयांची साखळी कायम राहावी आणि परिवर्तनाचा प्रवास अधिक मजबूत व्हावा,” यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मावळकरांचे मत आहे. अजित दादांनी दाखवलेला विकासाचा मार्ग पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील मावळ साकारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे नागरिक सांगत आहेत.
यावेळी अनेक नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,
“अजित दादांनी मावळसाठी जे केलं ते विसरता येणार नाही. त्यांनी घडवून आणलेला विकास पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
“अजित दादांनी मावळसाठी खूप केलं. आता त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची वेळ आपली आहे. ही केवळ निवडणूक नाही, ही अजित दादांच्या कामाला दिलेली श्रद्धांजली आहे. म्हणून मावळचा निर्णय स्पष्ट आहे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभं राहायचं.”
अजित दादांच्या स्मृतीला अभिवादन करत मावळकरांनी घेतलेला हा निर्धार येणाऱ्या काळात मावळच्या राजकीय आणि विकासात्मक दिशेला निर्णायक ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.



















