
सह्याद्री नामाच्या बातमीचा इफेक्ट; तळेगाव दाभाडेतील कुत्रिम गणेश विसर्जन हौद अखेर पूर्णपणे कोरडा
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेजवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारलेला कुत्रिम विसर्जन हौद अखेर पूर्णपणे रिकामा करून त्याची स्वच्छता करण्यात आली आहे. सह्याद्री नामा न्यूज पोर्टलवर दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत नगर परिषदेने तात्काळ कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


सदर कुत्रिम विसर्जन हौदामध्ये दीर्घकाळ पाणी साचून होते. विसर्जन हंगाम संपल्यानंतरही हौद रिकामा न केल्यामुळे त्या पाण्यात डासांची पैदास होत होती. परिणामी परिसरात डेंगू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे या हौदाच्या अवघ्या ५० फुटांच्या परिसरात नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा, नगर परिषदेची जुनी इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच दाट रहिवासी वस्ती आहे.


शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास थांबावा यासाठी सह्याद्री नामा न्यूज पोर्टलने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. बातमी प्रसिद्ध होताच नगर परिषदेच्या संबंधित विभागाने तातडीने हालचाली करत हौदातील साचलेले पाणी पूर्णपणे काढून टाकले. त्यानंतर हौदाची स्वच्छता करून परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे.


नगर परिषदेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. “माध्यमांच्या पाठपुराव्यामुळेच ही समस्या मार्गी लागली, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. भविष्यात अशा कुत्रिम विसर्जन हौदांची नियमित स्वच्छता व देखभाल करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















