
लोणावळ्यात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; सराईत विक्रेत्याकडून किलोभर गांजा जप्त
लोणावळा :अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा वेग वाढवत पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यात गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे 8.30 वाजता लोणावळा रेल्वे स्टेशनलगतच्या निर्जन परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 1.117 किलो गांजा जप्त करून एका सराईत विक्रेत्याला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 10 हजार रुपये असून, परिसरातील अवैध धंद्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा घट्ट नजर ठेवली असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


अंमली पदार्थांच्या प्रवाहावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि लोणावळा उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या सूचनांनुसार ही मोहिम राबवण्यात येत आहे. त्यानुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथक परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना पथकाला एका संशयित व्यक्तीबाबत गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने तातडीने रेल्वे स्टेशनजवळ धाड टाकली.


यामध्ये सत्तार इब्राहिम कुरेशी (वय 58, रा. टेबलचाळ, लोणावळा) हा स्थानिक पातळीवर ओळखला जाणारा सराईत गांजा विक्रेता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या ताब्यातील पिशवीतून मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. प्राथमिक चौकशीत आरोपी हा परिसरात सातत्याने अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act 1985) अन्वये गुन्हा नोंद केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार वीरसेन गायकवाड, हनुमंत वाळुंज, संदीप मानकर, पोलीस नाईक सुधीर डुंबरे तसेच पोलीस शिपाई राहुल चोरगे आणि नागेश कमठणकर यांच्या पथकाने अतिशय शिताफीने पार पाडली. रात्रीच्या वेळी निर्जन परिसरात केलेल्या या धाडीत पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि तत्परता कौतुकास्पद असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.


दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा गव्हाणे या करीत असून आरोपीच्या मागील गुन्हेगारी इतिहासासह त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लोणावळा परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी अशा आणखी कडक कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















