भाजप उमेदवार मृणाल म्हाळसकर यांच्या सह १७ नगरसेवक यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ
वडगाव कातवी │वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर व पक्षाच्या १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ शनिवारी झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मंत्री संजय बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तसेच ज्येष्ठ नेते अविनाश बवरे व बाबुराव वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली.
शुभारंभ सोहळ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ढोल-ताशांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि भव्य मोटारमिरवणुकीतून भाजपचे प्रभावी शक्तिप्रदर्शन झाले. उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते.
प्रचाराच्या शुभारंभी भाषण करताना पक्ष नेत्यांनी भाजपच्या विकासकारभाराचा ध्वज पुढे नेण्यासाठी वडगावकरांनी एकमुखाने साथ द्यावी, असे आवाहन केले. वडगावमध्ये पारदर्शक व सर्वसमावेशक कारभारासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
१७ प्रभागांतील सर्व नगरसेवक उमेदवार मंचावर उपस्थित होते. या उमेदवारांनी एकजूट आणि विकासाभिमुख भूमिकेवर भर देत नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
शुभारंभानंतर मृणाल म्हाळसकर यांचा पहिला प्रचारफेरीला प्रारंभ झाला. प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भाजपा उमेदवारांचा प्रचार प्रारंभापासूनच जोरदार गतीने सुरू झाला आहे.




















