“विधानसभा निवडणुकीत कमळ विसरले… आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कमळ कुठून आले?” — आमदार सुनील शेळके
वडगाव मावळ (प्रतिनिधी):
“विधानसभा निवडणुकीत कमळ विसरले… आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कमळ कुठून आले?” अशा शब्दांत आमदार सुनील अण्णा शेळके यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते वडगाव मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

आमदार शेळके म्हणाले की, “युती झाली तर ठीक आहे, पण झाली नाही तर स्वबळावर लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तोच आमचा खरा बळ आहे.”

ते पुढे म्हणाले की, “तिकीट वाटपाचा अंतिम निर्णय सुकून समिती घेईल, मात्र कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका न ठेवता पक्षनिष्ठा टिकवावी. विकासाचे राजकारण आणि लोकसेवा हेच आमचे ध्येय आहे.”

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शेळके म्हणाले, “विरोधकांना जनतेत विश्वास नाही म्हणून ते माझ्यावर जादूटोणा करतो, ईव्हीएम घोटाळा करतो असे हास्यास्पद आरोप करत आहेत. पण जनता सर्व जाणते आणि तीच योग्य वेळी उत्तर देईल.”
बैठकीला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, माजी तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, किशोर सातकर, सुरेश धोत्रे, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, प्रशांत भागवत, संपत दाभाडे, संतोष राऊत, संतोष जांभूळकर, साहेबराव कारके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप आंद्रे यांनी मानले.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि कार्यकर्त्यांना बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.




















